(कलिंग युद्धातील भिषण रक्तपात बघुन सम्राट अशोकाचे पश्चात्ताप-ग्रस्त मन त्याला विचारत आहे -)
अशोका,का घडवला असा संहार?
रणी रक्ताचे पाट वाहिले
लक्ष मृतांचे ढिग साचले
घायाळांच्या वेदनांना ना राहिला पारावर!
विधवांचे तू पिंजर पुसले
अनाथांचे पितृ-छत्र हरपले
समृध्द कलिंग का असे तुडवले?
बुजुर्ग रडले, राहिला न आता कुणाचा आधार!
निर्जन होईल जेव्हा धरोहर
करशील मग तु राज्य कुणावर?
दैत्ये लाजतील असा पाषाणी नर
अखिल मानवतेचा तू गुन्हेगार!
रिक्तकरीच मिसळतो मृदेत नृपती
हजार युध्दे लादतो कशासाठी?
एक नराच्या सर्वस्वासाठी -
का करती नर परस्परांवर जिवघेणे वार?
आक्रोशुन सांगते तुला हे नगर -
अशोका, तुझीच हि भिषण हार!
स्वागता आली ना एक विधवा नार
राजपदाचा उरला न काही तुजला अधिकार!
तु बुडवले कलिंग शोकसागरात
का रडसी आता या अंधारात?
तव परितापाने मिळेल का गत?
हाय तयांची तुझ्या जिवाला लागेल आता घोर
चल उठ,सोड ती अस्त्रे घातक
अन् आता हो बुध्द उपासक
अंगुलीमालाही झाला "अहिंसक"
पुसण्या हिंसेचा हा घोर कलंक -
कर आता तु मानवतेचा उद्धार!