निखारे- Pallavi Bhanap

भोळ्या चंद्रास गगनी

हसती खुशाल तारे

झाडांतून चकवत फिरती

वाकुल्या दाखवित वारे!

थरथरती उंच माडही

का भरावे असे कापरे

सळसळत्या झावळ्याही

का गाती असे बेसुरे?

सांडलेल्या चांदण्याला

वाटे फुटतील आता धुमारे

सत्यात टोचती शिंपल्यांचे

मात्र काटे अनेक बोचरे!

सावल्यांच्या लांबट प्रतिमा

चिकटून सोबतीस सारे

मागे वळून पाहता

अदृष्य तयांचे पसारे!

रेतीत रुतल्या पावलांना

लपेटती दिशांचे भोवरे

राहिले आज वस्तीला

रातकिडे किर्रर्र किरकिरणारे!

नीरव शांततेस भंगती

धुसमुसळ्या लाटांचे किनारे

पाण्यात धुमसत्या आगीचे

विझवू कसे मी निखारे?