रोज हसत, हसत आई, आई,
करून हैरान करणारी ओवी
आज उदास शांत पाऊलांनी आली,
आईला आज काहीतरी घडलय याची शंका आली ||१||
आई ओवीच्या खोलीत जाताच,
ओवी पाणावलेल्या डोळ्यांनी
खुर्चीत बसली होती,
आईने काय झाल विचारताच
चेहऱ्यावर प्रश्न व नजरेत भिती होती ||२||
आई रोज नवे प्रश्न, अनुभव, प्रसंगांनी
मी थकले आहे,
येईल तो दिवस सरत सरत नुसतीच पुढे चालले आहे. ||३||
वाईट नजरेच्या दोरीतून,
रोज फाशी मी घेते आहे
येणारा नवीन दिवस,
रोज अश्रुनी मावळत आहे. ||४||
खुप थकलेली, भयभीत झालेली
मी स्वतःला कमकुवत समजत आहे,
येणा-या संकटाला सामोरे जाण्याऐवजी
त्याच्या विचारानेच माघार घेत आहे. ||५||
आईने ओवीचे डोळे पुसले
व आरशासमोर उभ केल
म्हणाली,
स्त्री म्हणजे काय हे तुला सांगते ||६||
स्त्री ही चंद्रकिरणांसारखी शीतल, शांत तर कधी,
सूर्यकिरणांप्रमाणे प्रखर, अग्नी असते
अथांग सागराप्रमाणे मायेचा ओलावा देते
तर प्रसंगी दुर्गा काली बनून दुष्टांचा संहार करते ||७||
स्त्री हे एक कधीही न कोमेजणारे फुल आहे
त्याच प्रमाणे पर्वताला भेदणारी
एक तलवार देखील आहे ||८||
तसेच ओवी तुला
रातराणी जशी काळोखात दरवळत असते,
तसेच तूला कितीही बिकट परिस्थिती अली तरी
सकारात्मकतेचा सुगंधात दरवळायचे आहे
मनात विचारांचा कितीही कल्लोळ असला तरी
नदीप्रमाणे संथ तुला वाहायचे आहे ||९||
कधीही न विजणारी ज्योत
तुला बनायचं आहे,
वाटेत प्रकाश देणाऱ्या मशाली
सारखं ज्वलंत तुला जगायचं आहे ||१०||
आई म्हणाली सांग ओवी आता
तुला आरशात कशी ओवी दिसत आहे. ||११||
ओवी म्हणाली,
आई आता डोळयात पाणी नाही
तर चेहऱ्यावर धैर्याची चकाकी आहे,
मनात प्रश्न नसून
आत्मविश्वासाचे किरण आहे ||१२||
आभाळाला कडाडून सोडणारी विजेसारखी नजर आहे
खरंच आई,
अपार माया प्रेम वात्सल्य सहनशीलता
त्याग शौर्य चिकाटी शक्ती या सर्वांचा
संगम म्हणजेच स्त्री आहे ||१३||