आई गेली... - Pradnya Belkhode

आई गेली

आभाळ फाटलं

प्रत्येक थेंबाचं मन दाटलं

आई गेली

लांबल्या सावल्या

उदास उदासशा रेंगाळत राहिल्या

आई गेली

धूसर वाटा

उरात सतत सलणारा काटा

आई गेली

गेली रया

आटली सायीसारखी माया

आई गेली

खूप सोसून

काळजाचा तुकडाच कापून घेऊन

आई गेली

विरला वर्ख

गिळला दाहक दु:खाचा अर्क

आई गेली

विश्व शांत

मनात मात्र जन्मकळांचा आकांत

भाजला घसा

जळलं मन

पेशीपेशीतून आक्रंदन

आई गेली

आता मागू काय?

कुठे शोधू हक्काचे पाय?

आई गेली

उलटली वर्षं

मागे उरला ... फक्त स्पर्श!