थोडंसं जगायचं राहून गेलंय !- Pratik Parkhi

एका मागून एक अगणित क्षण निघून गेले,

श्वास प्रश्वासाचे चक्र अव्याहत चालूच आहे,

कधी सुखाची श्रावणी पांघरून दिवस आले,

कधी दुःख पिपाणी वाजवत निघून गेले,

अनेक नको नकोशा बऱ्याच हव्या हव्याशा,

मूक अनुभवांचं डबकं मनाच्या तळाशी साचलंय,

राहून राहून सारखं वाटतंय कि अजूनही,

थोडंसं जगायचं राहून गेलंय !

आयुष्य यज्ञातल्या लाकडांसारखं असतं,

सतत धगधगत राहणं इतकंच आपलं काम,

राख होणार म्हणून विझवून घ्यायचं नसतं,

प्रखरतेने पेटून सभोवतालच्या काळोखाला भेदायचं असतं,

अश्रू हृदयाला कमकुवत बनवत जातात,

आठवून पहा कुणाकुणाला सुखवायचा राहून गेलंय,

इतरांच्या जीवनाची कळी फुलवताना स्वतःसाठी मात्र,

थोडंसं जगायचं राहून गेलंय !

वाटा कितीही धूसर दिसू लागल्या तरी,

इच्छाशक्तीच्या जोरावर बुब्बुळांना ताणायचं असतं,

अंधारात हरवून जायची भीती सर्वांनाच असते,

म्हणूनच सूर्याला कवेत घेण्याचं धाडस करायचं असतं,

रिकामेच आलो होतो ओंजळ रिकामीच राहणार आहे,

प्रवासात उगाच चिंता कशाला कि माझं काय हरवलंय,

जे काही जमवलंय ते देऊन जातांना,

थोडंसं जगायचं राहून गेलंय !

अव्यक्त मनाला व्यक्त व्हायला सगळेच सांगतात,

कोणासमोर व्हायचं हे मात्र आपणच ठरवायचं असतं,

अपघातांची भीती वाटण्यात गैर काहीच नाही,

पण मन मात्र जुन्या जखमा भरायला वेळ मागत असतं,

प्रत्येक श्वास मोकळाच मिळावा असा अट्टाहास कधीच नव्हता,

अधूनमधून गुदमरणाऱ्या छातीला लळा लावायचं राहिलंय,

द्वेषाचे मळे उखडून प्रेमाच्या गर्द वनराईत,

थोडंसं जगायचं राहून गेलंय !