कवी- Yogita Takatrao

काय असते हो नक्की कविता?

कोणी सांगेल का मला

कविता वावरत असते आसपास

सगळे कवीलाच लागतात शोधायला !

कवितेत कवी शोधायचा नाही .. कधीच...

तो असतो एक माध्यम सशक्त ,

ज्यांना होता येत नाही व्यक्त

त्यांच्या मौनाचा हंबरडा आणि वेदनेचा हुंकार फक्त !

कवितेत कवी शोधायचा नाही..

त्याला जोडायचं नाही कवितेतल्या पात्रांशी

त्याच्या लिखाणात ...

आपल्याच भावना शोधायच्या नाही !

सतत का करायचं परीक्षण

त्याच्या कवितांचं भांडवल कधी करायचं नाही

आणि कवितेत कवी कधी शोधायचा नाही !

कवी म्हणजे काय हो ?

प्रतिबिंब समाजमनाचं

कोलमडलेल्या मनाला पाठबळ आधाराचं

चालू घडामोडींवर प्रभुत्व ओळींचं !

अन्याय सहन करून देखील ज्याला फुटत नाही वाचा ..

मौनातच गौण राहण्याचा ज्यांचा असतो साचा,

निराशेच्या गर्तेत ज्याची संपते आशा

कविता असते अशांसाठी उन्हातली छाया !

कधी विनोदात लपेटलेला दुःखांचा हास्यफवारा..

कवी तर असतो फार वेगळा,खोल अन् गहिरा,

काव्यातला मुखवटा त्याला सतत चढवायचा नाही

आणि कवितेत कवी कधी शोधायचा नाही !

कविता लिहिण्यासाठी नाहीच जरूरी..

प्रत्येक घाव काळजावर झेलणं ,

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीत

फुलतं त्याचं लिहिणं

नसतेच प्रसन्न प्रत्येकावर

प्रतिभेची लेखणी ,

योग्य शब्दांना काव्यात गुंफण्याचं कसब

प्रतिभेलाच जमत हसतखेळत !

विषयांच्या दुनियेत फिरतो अवांतर..

दुखऱ्या मनावर घालतो फुंकर ,

वेदनेचा आवरेना गहिवर

एक कविता स्फुरते अन् भाव होतो अनावर !

कुणाच्यातरी वेदनांची तार ,

कवितेशी येते जुळून

पोळणाऱ्याचं मन शांत

होऊन जातं कविता वाचून !

म्हणूनच या वैद्याचं दुकान कुठे शोधायचं नाही

त्याच्या शब्दांचा शब्दशः अर्थ कधी घ्यायचा नाही ,

व्यक्त होणाऱ्या संवेदनांना कधी छेडायचं नाही

आणि कवितेत कवी शोधायचा नाही !

कवितेत कवी कधीच शोधायचा नाही....