THE FOLLOWING POEM WAS SELECTED IN WINGWORD POETRY PRIZE 2023 LONGLIST.
जसे जसे विरत जाते अंतर तुझ्या माझ्यातले,
तसतसे दूरवरून येणार्या त्या
थंड काळ्या पाषाणांच्या हाकांमधून
ऐकू येत जाते
तुझ्या मकर कुंडलांची आदीम कीणकीण
आणि संथ होत जातात मनात उठलेली
युगायुगांची वादळे.
पावलागणिक नीवत जातात निराशेचे डोंब,
जेव्हा वाहत येतात नाम जपांचे
वारे तुझ्या गाभार्यातून,
जसजसा दिसू लागतो कळसावरचा
फडफडणारा आश्वस्त झेंडा,
ग्वाही देत जाते मन
तुझ्या निळगर्द अविचल अस्तित्वाची.
मग पायरी पायरीने ओढत आणतोस तू
तुझ्याकडे माझ्यातल्या तुला
आणि मी मात्र नुसताच वहावत राहतो
मिटून झरणारे डोळे.
गाभाऱ्याशी पोहोचता पोहोचता,
एकच गोंधळ उडतो माझ्या स्वत्वाचा..
गहिवरून शोधू पहातो मी स्वतःला,
असमर्थपणे लपवू पाहतो अस्वच्छ चेहरा माझा,
आणि उकरून काढण्याचा प्रयत्न करतो
प्राक्तनाच्या गाठोड्यातून आणलेले ते सारे
आणि ते ही जे मागून घ्यायचे आहे
अगोचरपणे.
पण जेव्हा तो गर्भार क्षण येतो
तुला आपादमस्तक न्याहाळण्याचा,
हतबल होतात माझे सारे गात्रगात्र,
राहून जाते मागायचे सारेच,
नुसतेच जुळतात हात असीम श्रद्धेने
आणि विरून जातो मी ही
क्षणार्धात तुझ्यात.
क्षण संपतो, मी ही सरतो,
आणि कलेवर माझे सरकत रांगेतून
येऊन पडते देवळाबाहेर
पण मी मात्र आतच घुटमळत
राहतो तुझ्या काळ्याभोर
पावलांशी...